By MahaTimes ऑनलाइन – बीड |
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे 16 वे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायतन सभाग्रहात उद्या मंगळवार दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या दरम्यान दोन सत्रांमध्ये होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई ठाणे येथे आयोजित केले आहे. सदरील राज्यस्तरीय अधिवेशन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली, प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब आणि प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या अधिवेशनामध्ये राज्यस्तरीय पुरस्काराने अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पत्रकार संघामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना देखील गौरवण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व पत्रकारांना आव्हान करण्यात येते की, पत्रकार संघाच्या सोळाव्या राज्यस्तरीय अधिवेशनला आपण उपस्थित राहून अधिवेशनाची शोभा वाढवावी.

या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सर्व उपस्थित पत्रकार बांधवांना पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारे साहित्य देखील वाटप करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील बीडसह औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या आठही जिल्ह्यातून पत्रकार संघाचे प्रमुख पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी रवाना होत आहेत. त्यामुळे हे राज्यस्तरीय अधिवेशन निश्चितच ऐतिहासिक ठरणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी म्हटले आहे.
