रुग्णांनी 21 ते 30 डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करण्याचे खटोड प्रतिष्ठानचे आवाहन
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
येथील झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने येत्या 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत 19 वा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे. यानिमित्त शहरातील जालना रोडवरील आनंदऋषीजी नेत्रालय, व्हिजन सेंटर येथे दि.9 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत खटोड प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दुर्धर त्वचारोग निदान व तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. शिबीरात त्वचारोगतज्ञ डॉ. गोविंद काळे हे रुग्णांची तपासणी करतील. तपासणीसाठी येण्यापूर्वी रुग्णांनी 21 ते 30 डिसेंबरपर्यंत आनंदऋषीजी नेत्रालय, व्हिजन सेंटर येथे समक्ष येवून नावनोंदणी करावी. या मोफत शिबीराचा जिल्हाभरातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड व पदाधिकार्यांनी केले आहे.
बीड येथे दरवर्षी नववर्षाचे स्वागत अध्यात्मिक विचारांनी करण्यासाठी राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन खटोड प्रतिष्ठानकडून केले जाते. या महोत्सवातून अध्यात्म, संगीत तसेच शैक्षणिक,सांस्कृतिक, आरोग्यविषयक कार्यक्रम राबवले जातात. आजपर्यंतच्या महोत्सवात सामुहिक विवाह सोहळे, मोफत नेत्ररोग तपासणी, व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॉपीमुक्तीसाठी महारॅली, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, कन्यारत्नांचा सामुहिक नामकरण सोहळा असे उपक्रम राबवले गेले आहेत. यंदाचा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न होणार आहे. दररोज दोन सांप्रदायिक कीर्तने, तसेच श्री भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेवशास्त्री महाराज यांची श्री ज्ञानेश्वरी भावकथा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित गणेश शिंदे व कलाकारांचा प्रबोधात्मक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कीर्तन महोत्सवानिमित्त बीड शहरात मोफत त्वचारोगनिदान शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. शहरातील जालना रोडवरील आनंदऋषीजी नेत्रालय येथे खटोड सामाजिक प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.9 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे. शिबीरात त्वचारोगतज्ञ डॉ. काळे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. डॉ.गोविंद काळे हे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असून आडस येथील राहिवासी आहेत. गत दहा वर्षांपासून डॉ.गोविंद काळे हे बीड येथील कीर्तन महोत्सवात सेवा देतात. बीड जिल्ह्यातील 5 हजाराहून अधिक रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड, शुभम खटोड, आशिष खटोड व सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.