कोरोना लसीसाठी आरोग्य कर्मचारी, आशावर्कर्सची दारोदार भटकंती !
By MahaTimes ऑनलाइन – बीड | फेरोज अहेमद
ओsss भाभी, चाचा-चाची लस लिए क्या लस ?…नहीं ली चलो…जान बचाना है तो पहले लस लो. अभीतक लस क्यों नहीं लिए ?.. चला पटापट चला …लस घ्या. आधार कार्ड आहे का ? मोबाईल नंबर सांगा ?…अशा हिंदी-मराठी मिश्रीत भाषेत आरोग्य विभागाची टीम गल्लोगल्ली फिरून, दारोदार भटकंती करीत लसीकरणापासून वंचित नागरीकांचा शोध घेउन त्यांना विनवणी करीत लस देतानाचे चित्र मंगळवारी बालेपीर भागात पहावयास मिळाले.

दरम्यान अनेकांनी सरळ सरळ लस घेण्यास नकार दिला. कोरोना लस घेतली तर अमुक अमुक होता. जीव पण जातो म्हणता.. लस घेउन ही पुन्हा कोरोना होतो मग लस का म्हणून घ्यायची अशा शेकडो प्रश्नांना तोंड देत त्यांच्या शंका निरसन करीत लसीकरण टीम चे सदस्य एएनएम एस.एस धुर्वे, आशाताई रूबीना खान, राजश्री गंतलेल्लू बालेपीर भागात घरोघरी जाऊन नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देत होते. सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी उशीरापर्यंत पायाला भिंगरी बांधल्यागत आपले कर्तव्य पाड पाडीत आहेत.

‘महाटाइम्स’ शी बोलतांना सिस्टर एस.एस धुर्वे म्हणाल्या की, कोरोना लस नागरीकांच्या जीवाच्या रक्षणासाठी आहे व एकदम सुरक्षित आहे. प्रत्येक नागरीकांनी आपले कर्तव्य समजुन लस घ्यावी. आम्ही प्रशासनाने दिलेले काम फत्ते करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करीत आहोत. आशाताई राजश्री गंतलेल्लू व रूबीना खान यांनी सांगितले की कोरोना लसीकरण केंद्र व वेळोवेळी आयोजित शिबिराच्या माध्यमातून जवळपास साठ टक्के नागरीकांनी लस घेतली आहे. उर्वरित नागरीकांना लस देण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशावरून आम्ही घरोघर जाऊन माहिती घेऊन लस देत आहोत.

आरोग्य विभागाने कंबर कसली
कोरोना संसर्गाची दूसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसर्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शंभर टक्के लसीकरणासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. आरोग्य कर्मचारी, आशावर्कर्स, अंगणवाडी सेविका आता लसीकेंद्रावरून उठून सरळ दारोदार भटकंती करून नागरीकांना लस देत आहेत. कोरोना महासाथीचा संसर्ग पुन्हा एकदा जोर धरत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग लसीकरण मोहिमेला गती दिली आहे.