By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्ह्यातील 123 पोट निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमधील 181 जागांचा व केज, आष्टी, पाटोदा, शिरुर का. आणि वडवणी या पाच नगरपंचायतचा सार्वत्रिक निवडणूकांसाठी दि. 21 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. सदर निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपाती व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी या क्षेत्रात सिआरपीसी 144 (2) कलम लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी राधाबिनोद शर्मा, बीड यांनी दिले आहेत.
सदरची निवडणूक शांततेत व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी बीड जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायत व आष्टी पाटोदा, शिरुर का. आणि वडवणी व केज या नगरपंचायत चे मतदानासाठी मतदान केंद्राचे 200 मिटर परिसरात फौ. प्र.सं. 1973 चे कलम 144 (2) लागू करण्यात आले आहे.
सदर आदेश निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही, मतदार केंद्राच्या परिसरात नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना वगळून पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. परंतू जे मतदार मतदानासाठी रांगेत संबंधित मतदान केंद्रावर उभे असतील त्यांना हे लागू राहणार नाही. मतदान केंद्राच्या परिसरात ध्वनीक्षेपक वापरास, वाद्य वाजविणे, मिरवणुका काढणे यावर प्रतिबंध राहील. शासकीय वाहनाव्यतिरिक्त इतर अनधिकृत वाहनांना 200 मिटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात येईल, हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, मयतीची अंत्ययात्रासाठी लागू राहणार नाहीत.