माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे मत
By MahaTimes ऑनलाइन, केज – बीड |
केज नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात वेगवेगळ्या समाज घटकांना संधी देण्यात आली असून ती केवळ तुमच्या सेवेसाठी आहे. पाच वर्ष ते तुमचे साल धरतील मेवा खाण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी हे उमेदवार दिले आहेत. आता सत्ता परिवर्तनाची खरी गरज असून केजच्या जनतेने शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे आणि धनुष्यबाणावर मतदान करून विकास कामासाठी हातभार लावावा असे आवाहन शिवसेना नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

केज नगर पंचायतसाठी मंगळवार दि.21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत नऊ वार्डात उमेदवार उभे आहेत. शुक्रवारी शहरात निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी शिवसेनेचे नेते दाखल झाले होते. सकाळी 11 वाजता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे केज शहरात आगमन होताच शिवसैनिकांनी व पदाधिकार्यांनी भव्य रॅलीने आणि तोफांच्या सलामीने त्यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
व्यासपीठावर जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, नितीन धांडे, तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, संजय महाद्वार, शिवाजी कुलकर्णी, किसन कदम, दिनकर कदम, रामराजे सोळंके, रत्नमाला ताई मुंडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संदिपान हजारे, नसीर भाई, तात्या रोडे, बाळासाहेब पवार, अशोक जाधव, अश्विनी बडे, स्वाती शिंदे यांच्यासह निवडणूक रिंगणात उभे असलेले सर्व उमेदवार उपस्थित होते.
सभेला उपस्थित मतदारांसमोर बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की,खेड्या पेक्षा बेक्कार हाल केज शहराचे झाले असून पायाभूत गरजा रस्ते, वीज, पाणी पूर्ण होणे गरजेचे होते. बस स्थानक व्यवस्थित नाही, सत्तेची संधी वारंवार देऊन जर विकास होत नसेल तर सत्ता परिवर्तन करण्याची नक्कीच गरज आहे. डोळसपणे मतदान करा मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचे आहेत. केज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख आनंद जाधव, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, गिरीश देशपांडे, संदिपान हजारे यांनी मनोगत व्यक्त करत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी परिसरातील शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.