By MahaTimes ऑनलाइन, – बीड |
संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तूत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा यांचे संवर्धन करता यावे व त्याबाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या आहेत. 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून पाळण्यात येतो.

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व उच्च महाविद्यालयांनी अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशिर हक्काची जाणीव / माहिती करुन देण्यासाठी ऑनलाईन वेबीनार पध्दतीने शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेवर व्याख्यान / चर्चासत्र ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावे.
शाळास्तरावर हा उपक्रम व्यापक प्रमाणात आयोजित करावा. तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन वेबीनार इ. व्दारा जास्तीत जास्त व्याख्यानमाला, परिसंवाद व चर्चासत्र इ. कार्यक्रम आयोजित करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, बीड यांनी केले आहे.