गेवराईत शारदा अकॅडमीचा शुभारंभ
By MahaTimes Online | Beed –
केवळ पगार आणि भपका बघून आय.ए.एस. होण्याचे स्वप्न बाळगू नका, समाजासाठी काम करण्याकरीता आय.ए.एस. व्हा, टॅलेंट अनेकजणांकडे आहे परंतु त्याला संधी मिळणे आवश्यक असते. अमरसिंह पंडित आणि शारदा अकॅडमीने तुम्हाला अधिकारी होण्याची संधी दिली आहे. कठिण परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्न करून या संधीचे सोने करा, यश नक्की मिळेल असे प्रतिपादन राज्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले. अमरसिंह पंडित यांनी उभारलेल्या मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जालना जिल्हाधिकारी विजय राठोड व उद्योगपती मानसिंग पवार उपस्थित होते.

शारदा प्रतिष्ठान आणि र.भ.अट्टल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा अकॅडमीच्या माध्यमातून गेवराई शहरात माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या पुढाकारातून मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे. राज्याच्या महसुल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्या शुभहस्ते सोमवार, दि.१३ डिसेंबर रोजी त्याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जालना आणि बीडचे जिल्हाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गेवराई सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक गुणवत्ता आहे केवळ साधन सामुग्रीच्या अभावामुळे त्यांच्या गुणवत्तेला आजवर संधी मिळाली नाही. मात्र शारदा अकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात गेवराई तालुक्याची ओळख ‘अधिकार्यांचा तालुका’ म्हणून करणार असल्याचे प्रतिपादन माजी आ.अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या प्रास्ताविकपर भाषणात केले.
उद्घाटनपर भाषणात बोलताना अप्पर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर म्हणाले की, केवळ स्पर्धा परिक्षेतील यश एवढे एकमेव उद्दिष्ट ठेवू नका तर उत्तम नागरीक बनण्याचे अंतिम ध्येय ठेवून काम करा आपल्या यशामध्ये समाजाचा मोठा हातभार असतो, त्याची जाणीव ठेवून समाजासाठी काहीतरी करा आय.ए.एस. परिक्षा कठिण असल्या तरी त्या अशक्य नाहीत, यासाठी कठोर परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्नांची तयारी ठेवा. नवनिर्मितीमधून सतत समाधान मिळते, आय.ए.एस. अधिकार्यांना दररोज नवीन काहीतरी करण्याची संधी मिळत असते. या अधिकार्यांच्या एका निर्णयामुळे करोडो लोकांवर त्याचे परिणाम होत असतात, त्यामुळे अशा समाधानासाठी आय.ए.एस. होण्याचे स्वप्न बाळगा. अमरसिंह पंडित आणि त्यांच्या सहकार्यांचे त्यांनी तोंडभरून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जालन्याचे जिल्हाधिकारी तथा गेवराई तालुक्याचे भुमिपूत्र विजय राठोड यांनी आपल्या भाषणात अमरसिंह पंडित यांनी गेवराईत सुरु केलेल्या उपक्रमाचे स्वागत करून तालुक्यात अधिकार्यांची नवीन फळी या उपक्रमामुळे भविष्यात नक्की निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करताना शारदा अकॅडमीच्या कामासाठी मी कधीही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सैन्याच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीदांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आभार प्राचार्या डॉ.रजनी शिखरे यांनी मानले तर संचलन प्रा.समाधान इंगळे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.