
बीड (प्रतिनिधी) :– लॉयन्स क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोच्यावतीने प्राचार्य डॉ. सविता शेटे यांना ‘द्रौणाचार्य पुरस्कार-2021’ ने सन्मानित करण्यात आले. सिवो विवेक अभ्यंकर मल्टीपल कॉन्सिल चेअरमन, लॉयनेस चारूलता कुलकर्णी, अध्यक्ष लॉयनेस उषा देशपांडे, सचिव आणि लॉयनेस प्रमिला नवटक्के कोषाध्यक्ष यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. सविता शेटे यांना सन्माचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ. सविता शेटे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची या ‘द्रौणाचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
बीड येथे महिला महिला कला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर कार्यरत असतांना समाजातील महिला, मुलींच्या शैक्षणिक समस्या सोडविणे, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार्या डॉ. सविता शेटे यांचे शैक्षणिक चळवळीत भरीव योगदान आहे. नॅक बैंगलोर द्वारा नॅक पियर टिम वर नियुक्ती, शासनाच्या शैक्षणिक, सामाजिक समितीवर सदस्यत्व आहे. मुलींचे शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, विवेक जडण-घडणीसाठी तसेच समाजातील महिला, बालक, युवक-युवती सर्वांसाठी, सामाजिक, शैक्षणिक कार्यात डॉ. सविता शेटे यांचा सिंहाचा वाटा आहे.
कोविड महामारीच्या काळातही महिला, विद्यार्थीनी आणि युवा यांच्यासाठी विविध विषयावर वेबिनारचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण व्हावे यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. प्राचार्य डॉ. सविता शेटे यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी यापुर्वी महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, मअंनिसचा आधारस्तंभ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, कै. राधाबाई कुलकर्णी पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद द्वारा राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारा जीवन गौरव पुरस्कार, आदर्श प्राचार्य पुरस्कार असे अनेक शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत.
लॉयन्स क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो द्वारा मिळालेल्या ‘द्रौणाचार्य पुरस्कारा’बद्दल प्राचर्य डॉ. सविता शेटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.